Wednesday, August 5, 2009

श्रेय

कधी कधी
सगळंच कसं चुकत जातं!
नको ते हातात येत,
हव ते हुकत जातं!

अशा वेळी काय करावं?
सुकलेल्या झाडांना
न बोलता पाणी द्यावं!

निशब्द..

पाखरू निमूट बसलेलं
डोळे मिटून गच्च रानात
तसे शब्द माझ्या मनात!

चांदण्यांचं अबोलपण
हिरव्या स्तब्ध पानात
तसे शब्द माझ्या मनात!

म्हणूनच शब्द असे
भिजून येतात
खोल खोल निश्ब्दात
रुजून येतात!

जगणं सुंदर आहे...

माझ्या प्रेमा
जगणं सुंदर आहे;
डोळे भरून
बघणं सुंदर आहे!

तुझी हाक
तळ्यावरून येते,
वाऱ्याच्या माळ्यावरून येते:
थरारून
ऐकणं सुंदर आहे;
माझ्या प्रेमा
जगणं सुंदर आहे;
डोळे भरून
बघणं सुंदर आहे!

मातीच्या
ओल्या ओल्या वसत,वाऱ्याच्या
खोल खोल श्वासात
झाडांचं
भिजणं सुंदर आहे;
माझ्या प्रेमा,
जगणं सुंदर आहे!

फुलांचे
वास विरून जातात;दिलेले
श्वास सारून जातात!
असण्याइतकंच
नसणं सुंदर आहे;
माझ्या प्रेमा
जगणं सुंदर आहे..

मन मोकळं....

मन मोकळं ,अगदी मोकळं करायचं,
पाखरू होवून पाखराशी बोलायचं!

तुमचं दुखः खरं आहे कळतं मला ,
शपथ सांगतो,तुमच्या इतकंच छळत मला ;
पण आज माझ्यासाठी
सगळं सगळं विसरायचं,
आपण आपलं चांदणं होवून
अंगणभर पसरायचं !

सूर तर आहेतच:आपण फक्त झुलायचं!
मन मोकळं,अगदी मोकळं करायचं,
पाखरू होवून पाखराशी बोलायचं!

आयुष्यात काय केवळ
काटेरी डंख आहेत?
डोळे उघडून पहा तरी:
प्रत्येकाला पंख आहेत!

हिरव्या रानात,
पिवळ्या उन्हात
जीव उधळून भुलायचं!
मन मोकळं,अगदी मोकळं करायचा,
पाखरू होवून पाखराशी बोलायचं!

तरीसुद्धा....

समूहात बसून हि गाणी
ऐकावीशी वाटली तर
त्यात काय चूक आहे?
शब्दांचं नादरूप
असं मिळून भोगणं ही
प्रत्येकाची अटळ अशी भूक आहे!

तरीसुद्धा डोळे मिटून
मनोमय तालावर
आपल्याच मनात नाचता आलं पाहिजे;
एकट बसून एकट्याने
प्रत्येक गाणं
आपल्याच मनात वाचता आलं पाहिजे!