Tuesday, November 3, 2009

जन्म...

मी न घेतले, तरि मिळाले
कधीच मी जे घेऊ नये.
तुही दिल्याविण दिलेस सारे
कधी कुणी जे देऊ नये.

पिचलेल्या जन्मातुन रुजले
विजभारले सुर नवे.
ऐकण्यात जे व्यथेत मिटले
लोचन राधेचेच हवे.

श्याम घनांची उतट अनावर
कासाविस बरसात अशी.
काळोखाच्या यमुनेकाठी
धडधडणारी हवी पिशी.

मलाच नकळत माझे डोळे
यमुनेतुन वाहत जाती.
अंधपणातच चाचपतो मी
फुटल्या जन्माची माती.

दान तुझे हे घेण्यासाठी
फुटल्यावाचुन हात कुठे???
या भरलेल्या रित्या ओंजळीत
हिरवा हिरवा जन्म फुटे.

भेट तुझी माझी स्मरते...

भेट तुझी माझी स्मरते, अजुन त्या दीसाची
धुंद वादळाची होती, रात्र पावसाची ॥ध्रु॥

कुठे दीवा नव्हता, गगनी एकही ना तारा
आंधळ्या तमातुन वाहे , आंधळाच वारा
तुला मुळी नव्हती बाधा, भीतीच्या वीषाची ॥१॥
धुंद वादळाची होती, रात्र पावसाची.....

क्षुद्र लौकीकची खोटी झुगारुन नीती
नांव्गांव टाकुन आली अशी तुझी प्रीती
तुला परी जाणीव नव्हती तुझ्या साहसाची ॥२॥
धुंद वादळाची होती, रात्र पावसाची.....

केस चींब ओले होते, थेंब तुझ्या गाली
ओठांवर माझ्या त्याची कीती फुले झाली
श्वासांनी लीहीली गाथा प्रीतीच्या रसाची ॥३॥
धुंद वादळाची होती, रात्र पावसाची.....

सुगंधीच हळव्या शपथा, सुगंधीच श्वास
स्वप्नांतच स्वप्न दीसावें तसे सर्व भास
सुखालाही भोवळ आली मधुर सुवासाची ॥४॥
धुंद वादळाची होती, रात्र पावसाची

भेट तुझी माझी स्मरते, अजुन त्या दीसाची
धुंद वादळाची होती, रात्र पावसाची